चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी निधीची कमी पडणार नाही
दीक्षाभूमीवर जनसागर
चंद्रपूर दि.16 ऑक्टोंबर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातील सामाजिक न्यायाच्या चौकटीला अधिक बळकट करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असून त्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे या देशाची प्रगती निश्चित करणा-या संविधानाच्या बांधिलकीवरच कोणत्याही सरकारचे भवितव्य अंवलबून असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज येथे केले. चंद्रपूर येथे जमलेल्या हजोरोच्या जनसमुदायाला त्यांनी यावेळी दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवरील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर आदी उपस्थित होते.
केंद्रातील सरकारची वाटचाल देखील फुले, शाहू, आंबेडकर या विचारांवरच सुरु असून उपेक्षित समाज घटकांच्या भल्यासाठी मोठया प्रमाणात योजना सुरु आहेत. या देशामध्ये संविधान बदलण्याची कोणाची ताकद नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत असणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर गौतमबुध्दांचा प्रभाव आहे. केंद्रातील सरकार बाबासाहेबांच्या विचारांनेच चालावे यासाठीच आपण सत्तेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता ऐकवून आपल्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीनंतर चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक महत्वाला विषद केले. बाबासाहेबांनी त्या काळात हिंदू धर्मातून बौध्द धर्म निर्माण करेपर्यंत हिंदू धर्मातच समता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या धर्मातील विभागणी, चार्तुवर्ण जो पर्यंत बदल नाही. तो पर्यंत देशाची प्रगती नाही, असे ठाम मत त्यांनी मांडले होते. त्यानंतरच त्यांनी धर्मपरिवर्तनाचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय तेव्हा योग्य होता. यावर आता सर्वांचे एकमत झाल्याचेही त्यांनी सांगितले. रिपब्लीकन ऐक्यासंदर्भात त्यांनी आपल्या भूमीकेचा पुनरुच्चार केला. ऐक्यासाठी मी दहा पाऊले मागे यायला तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी निधीची कमी पडणार नाही. या ठिकाणी उत्तम वास्तु निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांनीही संबोधित केले.
व्हिडीओ संदेशाव्दारे पालकमंत्र्यांचा संवाद
या कार्यक्रमाला काही कारणास्तव अनुपस्थित असलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संदेशाचा खास व्हिडीओ पाठवत. पुढच्या वर्षी दोन कोटी रुपयांच्या अद्ययावत स्मारकासह मी स्वत: कार्यक्रमाला उपस्थित राहील, असा संदेश पाठवला. त्यांनी दीक्षाभूमी येथील स्मारकासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या संदर्भात 25 सप्टेंबरला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत आदेश निर्गमीत करण्यात आला होता. आपल्या अभिवचनाप्रमाणे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी आवश्यक निधी दिला असल्याचे त्यांनी आपल्या व्हीडीओ संदेशात सांगितले.
नागपूर नंतर देशात चंद्रपूर येथे बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तनाची दीक्षा दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून दरवर्षी लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात. 61 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ 15 व 16 ऑक्टोंबरला दरवर्षी या भूमीत साजरा होतो. यासाठी यावर्षी दोन दिवसांचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एहिपस्सिको, धम्मध्वजारोहण, धम्मज्योत प्रज्वलन, सामुहीक बुध्द वंदना आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अरुणाचल प्रदेश येथील भदन्त डॉ.वन्नासामी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे याशिवाय धम्म समारंभाच्या कार्यक्रमामध्ये जगभरातील वेगवेगळया ठिकाणचे भदन्त सहभागी झाले होते.
दीक्षाभूमीवर या दोन दिवसाच्या काळात पुस्तकांची शेकडो दुकाने लक्षवेधी होती. वैचारीक पुस्तकांसोबत बौध्द धर्मावरील अनेक पुस्तकांचा यामध्ये सहभाग होता. बाबासाहेबांनी लिहलेल्या पुस्तकांसोबतच नामवंत लेखकांनी बाबासाहेबांवर लिहलेल्या पुस्तकांची मोठया प्रमाणात विक्री झाली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाने या ठिकाणी लोकराज्यच्या स्टॉलवर विभागातर्फे विशेषत्वाने प्रकाशित केलेल्या महामानव या अंकाची प्रदर्शनी लावली होती.
000
No comments:
Post a Comment