चंद्रपूर, दि.16 ऑक्टोंबर – राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत महाकर्जमाफी दिवाळीपूर्वी शेतक-यांना देण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी युध्द पातळीवर तयारी सुरु केली आहे. 18 ऑक्टोंबरला शेतक-यांचा प्रातिनिधिक सन्मान प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी केला जाणार आहे. कर्जमाफीला पात्र ठरलेल्या शेतक-यांपैकी काहींना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र समारंभपूर्वक देण्यात येणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या संदर्भात मुंबईवरुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हा प्रशासनाला ही सूचना केली आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 34 हजार कोटीची आतापर्यंतची सर्वात मोठी महाकर्जमाफी राज्यात शेतक-यांना दिली आहे. गेल्या 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या देखरेखी खाली जिल्हाभरात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे व माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. दिवाळीपूर्वीच कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. आज या संदर्भात राज्य शासनाने तातडीने आदेश काढून सर्व जिल्हयांना 18 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या एक दिवसापूर्वी प्रत्येक जिल्हयामध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यापैकी प्रत्येक तालुक्यातील अटी व शर्तीत बसणा-या शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र व साडीचोळीची भेट देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. हजारो शेतक-यांपैकी काही शेतक-यांना समारंभपूर्वक हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यांची नांवे सहकार विभागाकडून उदया कळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी दिली आहे.
18 तारखेला मुंबईमध्ये महाकर्जमाफीचा मुख्य सोहळा होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांशी संवाद साधणार आहे. या मुख्य सोहळयाला प्रत्येक जिल्हयातून दोन शेतकरी दाम्पत्याला पाचारण केले जाणार असून स्वत: मुख्यमंत्री समारंभपूर्वक प्रमाणपत्र व दिवाळीची भेट देणार आहेत. प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील भाषण एकाच वेळी सर्वत्र प्रसारित केले जाणार आहे. आज झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगला जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक एस.एम.अर्जूनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे मनोहर शेंडे व सहाय्यक निबंधक स्वप्नील पाटील उपस्थित होते.
000
2018 at 05:00
ReplyDeleteकर्जमाफिच्या पहिल्या टप्प्यात कर्ज माफीचा फार्म भरून सुद्धा २५% कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
सध्या २५००० कर्जमामाफीकरिता फार्म भरला आहे, परंतु शासनाच्या नविन धोरणाचा नुसार १,५०,००० रूपये कर्जमाफी करिता लाभार्थी होत असल्याने, भरलेला फार्म update करण्याचा प्रयत्न केला, परंतू हे होत नाही,तेव्हा १,५०,००० रूपये कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता काय करावं लागेल,
कृपया मार्गदर्शन करा