जिल्ह्यात क्रेडिट आऊटरीच कॅम्प कार्यक्रम
चंद्रपूर, दि.25: भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे यांच्या सुचनेनुसार अग्रणी जिल्हा प्रबंधक आणि सर्व बँकांच्या सहकार्याने नियोजन भवन, चंद्रपूर येथे क्रेडिट आऊटरीच कॅम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य प्रबंधक पंकज चिखले, बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक जितेंद्र मस्तमौला, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रमोद साबळे, सीडीसीसी बँकेचे अशोक पवार, व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा आदींची उपस्थिती होती.
व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल यांनी लोकांच्या वित्तीय साक्षरतेच्या जागृतीबद्दल विस्तृत माहिती दिली आणि सतर्क व सावध राहून बँकेची वित्तीय देवाणघेवाण करण्याची सूचना केली. तसेच नाबार्ड बँकेबद्दल व नवीन उद्योजक लाभार्थ्यांकरिता नाबार्डच्या विविध योजना व त्याचे लाभ आदींची माहिती त्यांनी समजावून सांगितली.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व नागरिक, पथविक्रेता, व शेतकरी व नव उद्योजकांना माहिती देऊन संबंधित बँकेची संपर्क साधून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
एम.आय.डी.सीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी, जिल्ह्यात नवीन उद्योजक निर्माण व्हावे, यावर मार्गदर्शन करून एमआयडीसी मधील स्थापित उद्योजकांना वेळोवेळी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी वित्तीय सहायता केल्याबद्दल आभार मानले.
०००००००
No comments:
Post a Comment