जिल्ह्यात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ
चंद्रपूर, दि.28: जिल्ह्यात डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यात गप्पी मासे सोडून करण्यात आली. याप्रसंगी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉनसन यांनी नागरीकांना साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याचे आवाहन केले.
सदर मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. गप्पी मासे डास अळयांचे भक्षण करतात आणि डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातच डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. डासांच्या जीवनचक्रातील एक तृतीयांश वेळ ते पाण्यात व्यतीत करतात. डास उघड्या पाण्यामध्ये अंडी घालतात. या अंडीचे रूपांतर डासअळीत आणि नंतर कोषामध्ये होते. साधारणत 10 ते 12 दिवस पाण्यात व्यतीत केल्यानंतर प्रौढ डासाची निर्मिती होते. प्रौढ डास उडायला लागतात. त्यामुळे पाण्यात असतांना यावर नियंत्रण मिळविणे सोपे आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये गप्पी मासे उपलब्ध आहेत. डासापासून डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग या किटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे या डासापासून स्वत:चे संरक्षण करण्याकरीता पूर्ण बाह्याचे कपडे घालणे, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिरोधक मच्छर अगरबत्ती, कॉईल, क्रीमचा वापर करणे, घरच्या सभोवताल पाणी साचू न देणे, साठवलेले पाणी आठवड्यात एकदा रिकामे करून कोरडा दिवस पाळणे, पाण्याचे टाके झाकून ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे अंगावर ताप काढू नये. ताप आल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment