स्वत:च्या कामातून विभागाची चांगली प्रतिमा निर्माण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø महसूल दिन कार्यक्रम व महसूल सप्ताहाचा शुभारंभ
चंद्रपूर, दि. 1 : शासकीय कार्यालयात सर्वसामान्य माणूस विविध कामे घेऊन येत असतो. स्वत:ची मोलमजुरी सोडून आणि वेळ काढून तो आपल्याकडे येतो, याची जाणीव संबंधित कर्मचा-यांनी ठेवावी. शासकीय काम घेऊन येणा-या माणसाला चांगली वागणूक दिली तर त्याच्या चेह-यावर समाधान दिसते. आदर आणि अधिकार आपल्याला कामातूनच मिळू शकते. त्यामुळे संवेदनशीलपणे काम केल्यास स्वत:ची तसेच विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
नियोजन सभागृहात महसूल दिन कार्यक्रम व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, भुमी अभिलेख विभागाचे अधिक्षक प्रमोद घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मुद्रांक नोंदणी विभागाच्या सहा. संचालक श्रीमती तांदळे उपस्थित होते.
महसूल विभाग हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जमिनीचे व्यवस्थापन व महसूल गोळा करणे या अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. राज्याचा चालविण्यासाठी महसूल लागतो. इतर विभागाचे कार्यक्षेत्र ठरवून दिले असतात. मात्र महसूल विभागाला स्वत:च्या कामासोबतच इतरही जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अधिकारी / कर्मचा-यांनी आनंदी राहून काम करावे. स्वत:तील उणिवा आणि कमतरता समजून घेऊन काम केले तर स्वत:मध्ये बदल होईल आणि विभागाचे सुध्दा नाव होईल.
पुढे ते म्हणाले, आपल्याकडे काम घेऊन येणा-या सामान्य माणसाचे समाधान करा. संवेदनशीलपणे काम हाताळल्यास चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काम करण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे नवीन गोष्टी आत्मसाद केल्या तरच स्वत:चे अस्तित्व टिकून राहील. शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा. शिकण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच संपूर्ण आठवडाभर महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, यात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मनुष्याच्या जीवनात बदल घडविणारा महसूल विभाग : मु.का.अ. विवेक जॉन्सन
महसूल विभाग हा शासनाचा मुख्य कणा असून जमिनीसंदर्भातील प्रकरणांशी सर्वसामान्य माणसांचा संबंध येतो. आपण लोकांसाठी काम करतो, याची जाणीव ठेवावी. कारण मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा हा विभाग आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. पुढे ते म्हणाले, ई-गव्हर्नन्स, डाटा मॅनेजमेंट ही अतिशय महत्वाचे उपक्रम आहेत. त्यानुसार सर्व अधिकारी/कर्मचा-यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. आपल्याला नागरिकांच्या सेवेची संधी मिळाली, या उद्देशाने तसेच संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्वक कामे करा, असे आवाहन त्यांनी केले.
कामाप्रती प्रामाणिक आणि निष्ठावान राहा – अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे
नागरी जीवनात जमीन व्यवस्था हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जिल्हाधिकारी हे केवळ एक पद नाही तर ती एक संस्था आहे. निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना अशा महत्वाच्या जबाबदा-या महसूल विभागाला पार पाडाव्या लागतात. शासकीय कामकाजात काळानुरूप बदल होत आहे आणि बदल स्वीकारणे ही प्रत्येकाची गरज आहे. तरच आपण या व्यवस्थेत टिकू शकतो. कर्मचा-यांनी तांत्रिक बदल शिकण्यावर भर द्यावा. तसेच आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि निष्ठावान राहावे, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले.
यावेळी भुमी अभिलेख अधिक्षक प्रमोद घाडगे, नायब तहसीलदार राजू धांडे, अव्वल कारकून नितीन पाटील, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार यांनीसुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे.
या कर्मचा-यांचा झाला सन्मान : नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे, अव्वल कारकून मिना सिडाम, मंडळ अधिकारी आकाश भाकरे, महसूल सहाय्यक महेश मेहर, तलाठी योगेश सागूळले, कोतवाल भोजराज चौधरी, शिपाई समीर धात्रक यांच्यासह भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार गणेश मानकर, मुख्या. सहाय्यक प्रज्ञा नंदेश्वर, परिरक्षण भुमापक सचिन पवार, क. लिपीक अजय टिपले, भुकरमापक संतोष जुनघरे आणि स्वरुप गौरकार आणि वाहनचालक एच.एस.शेख.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी केले. संचालन प्रिती डूडूलकर यांनी तर आभार शैलेश धात्रक यांनी मानले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment