Search This Blog

Monday, 1 August 2022

जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धा 2022-23

 

जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धा 2022-23

Ø 5 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका व स्पर्धा सहभाग शुल्क जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 1 ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तर ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे.

जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटी, नवी दिल्ली च्या वतीने सन 2022-23 या वर्षातील राष्ट्रीय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. 02 सप्टेंबर ते 09 ऑक्टोंबर 2022 या कालावधी शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनियर) आणि 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतारखेनुसार वयोमर्यादा 15 वर्षे मुले (सब ज्युनियर) 1 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षे मुले व मुली (ज्युनियर) 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा / असावी.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शाळा व संघांनी आपल्या संघाच्या प्रवेशिका तसेच स्पर्धा सहभाग शुल्क, फी दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता क्रीडा मार्गदर्शक संदीप ऊईके यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या संघांनी नोंदणी वेळेत सादर केली नाही, अशा संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

सन 2022-23 च्या स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविड-19 बाबत काही सूचना आल्यास त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. सद्य:स्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत-जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment