Search This Blog

Saturday, 6 August 2022

पशुपालकांना घरपोच सेवा मिळण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

 पशुपालकांना घरपोच सेवा मिळण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

सेवेसाठी 1962 टोल फ्री क्रमांक

चंद्रपूर दि. 6 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रथमोपचाराच्या किटसह अद्ययावत असलेली ॲम्बुलन्स फिरते पशुचिकित्सा पथकाच्या माध्यमातून पशुपालकांना सेवा देण्यात येत आहे. याद्वारे जखमी आणि जायबंदी जनावरांना सेवा सुश्रूषेसाठी घेऊन जाणे अत्यंत सुखर होणार असून मुक्या जनावरांना वेळीच उपचार मिळणे शक्य होणार आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत 73 फिरते पशुचिकित्सा पथके कार्यान्वित झालेली असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फिरते पशुचिकित्सा पथक, राजुरा, सिंदेवाही, भद्रावती व मूल असे 4 फिरते पशुचिकित्सा पथक पशुपालकांच्या दारात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करीत आहे. तसेच शासन निर्णयाद्वारे सदर फिरत्या पशुचिकित्सा पथकांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संबंधित तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे.

गरजू पशुपालकांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर सेवा विनंती नोंदविल्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयात स्थापित करण्यात आलेल्या मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारा संबंधित विनंती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था अथवा फिरत्या पशुचिकित्सालयाकडे अग्रेषित केली जाते व संबंधिताद्वारे पशु रुग्णावर रोग लक्षणानुसार विहित काल मर्यादेत उपचार करण्यात येतात. आजारी जनावरांवर रोग लक्षणानुसार पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांमध्ये प्रसूती संबंधी सेवा, प्रथमोपचार सेवा, तातडीच्या चिकित्सकीय सेवा, शस्त्रक्रिया सेवा व इतर कोणत्याही चिकित्सकीय आपत्कालीन परिस्थितीत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अशा पद्धतीने विभागण्यात येऊन त्यानुसार पशुधनावर उपचार करण्यात येतो.

पशुपालकाकरिता घरपोच सेवा मिळण्यासाठी शासनाची महत्त्वकांशी योजना मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना तयार केली असून त्याकरिता पशुपालकांना केवळ त्यांच्या दूरध्वनीवरून 1962 या टोल फ्री क्रमांकावर सेवा उपलब्ध करून घेता येईल.

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी घरपोच सेवा मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात 1962 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून आपल्या पशुधनावर उपचार करून घ्यावा व मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment