15 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा
चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत असून 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण 60:40 आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेला व्यापक स्वरूप देण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा साजरा केला जात आहे.
या पंधरवाड्यात 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीस्तव सादर केले आहेत, त्या बँक शाखा व्यवस्थापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यांसमक्ष पडताळणी व त्रुटींची पूर्तता करून घेण्यात येईल. तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती, सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांमार्फत विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाइन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीस्तव सादर करतील.
याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी सनियंत्रण करतील. जिल्हास्तरावरील प्रस्ताव प्रलंबित असणाऱ्या बँक, संबंधित कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व त्याचे सनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने करतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment