Search This Blog

Monday, 29 August 2022

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे महिला सक्षमीकरण शिबीर

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे महिला सक्षमीकरण शिबी

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंडपिपरी येथे कायदेविषयक जनजागृतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण शिबीर घेण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. कांबळे, सचिव श्री. काळे, गोंडपिपरीचे विस्तार अधिकारी डी. एस. सावसाकडे तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

महिलांनी त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्याचा योग्य वेळी व गरज असल्यास उपयोग करावातसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवेबाबत सचिव सुमित जोशी यांनी माहिती दिली. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समिती गोंडपिपरीचे अध्यक्ष प्रतीक लंबे यांनी कार्यक्रमाचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.

अधिवक्ता आम्रपाली लोखंडे यांनी भारताची राज्यघटना, हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, हिंदू विवाह कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा आदी विषयावर मार्गदर्शन केले. त्यासोबतच अधिवक्ता संजीवनी मोहोरकर यांनी पोटगीचा कायदा, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड विधान अंतर्गत येणाऱ्या लैंगिक गुन्हे व शिक्षांबाबत मार्गदर्शन केले.

गोंडपिंपरीचे संरक्षण अधिकारी शामराव मोडीलवार यांनी कौटुंबिक हिसांचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 बाबत माहिती दिली. तर पूनम बांबोडे यांनी महिलांसाठी असणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित महिलांना कायदेविषयक माहिती देणारी पुस्तिका किट देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रतिनिधी वनिता घुमे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश रामटेके तर आभार डी. एस. सावसाकडे यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment