Search This Blog

Wednesday, 10 August 2022

‘घरोघरी तिरंगा’ व पूर परिस्थितीबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा



 

‘घरोघरी तिरंगा’ व पूर परिस्थितीबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 10 ऑगस्ट : नागपूर येथे नव्याने रुजू झालेल्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान व चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सा.बा. विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, पालिका प्रशासन अधिकारी अजित डोके आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्तांनी, जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे. गावागावात झेंडे पोहचले की नाही, याची खात्री करा. तसेच झालेले उपक्रम संबंधित संकेतस्थळावर अपलोड करून यंत्रणांनी 13 तारखेपासून नियमित गुगलशीट भरावी, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात एकूण 4 लक्ष 93 हजार घरांवर झेंडा फडकविण्याचे नियोजन असून यापैकी 3 लक्ष 14 हजार झेंड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर दीड लक्ष झेंडे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पूर परिस्थितीचा आढावा घेतांना विभागीय आयुक्त म्हणाल्या, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु किंवा जखमी झालेल्यांना शासन निर्णयानुसार तात्काळ मदत द्या. याबाबत कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहायला नको. तसेच पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी 108 कोटी, घरांच्या नुकसानीकरीता 4 कोटी, रस्ते व पूल यांच्या नुकसानीकरीता 136 कोटींची मागणी करण्यात आली आहे. तसेच महानगर पालिका हद्दीतील 90 कुटुंबातील 332 लोकांना स्थानांतरीत करण्यात आल्याचे मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment