Search This Blog

Wednesday 24 August 2022

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार


 

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय

चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या 15 लक्ष रू. अर्थसहाय्याच्‍या रक्‍कमेत वाढ करत ही रक्कम 20 लक्ष रू. इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केला. याबाबतचा शासन निर्णय 23 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम पध्‍दतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणा-या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तिन वर्षात अनुक्रमे 47,80,86 इतकी मनुष्‍यहानी झाली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबटया, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणा-या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणा-या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍यात आली असून यापुढे 15 लक्ष ऐवजी 20 लक्ष रू. इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. 20 लक्षपैकी 10 लक्ष रू. देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तात्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रूपये 10 लक्ष त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणा-या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास रू. 5 लक्ष तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास रू. 1 लक्ष 25 हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा 20 हजार रू. प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणा-या 60 हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून ती 70 हजार रू. इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणा-या 10 हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून 15 हजार रू. इतकी वाढ करण्‍यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी 12 हजार इतकी रक्‍कम वाढवून 15 हजार रू. करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी 4 हजार रू. ची रक्‍कम 5000 रू. इतकी करण्‍यात आली आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी व त्‍यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.

00000

No comments:

Post a Comment