Search This Blog

Tuesday 2 August 2022

महसूल विभागात कामाची विविधता – जिल्हाधिकारी गुल्हाने

 





महसूल विभागात कामाची विविधता – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार

चंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट : निवडणूक व्यवस्थापन, कोविड महामारी, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थती अशा एक ना अनेक कामांमध्ये महसूल विभागाला नेहमीच अग्रेसर राहावे लागते. विभागाची नाळ सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांच्याशी जुळली आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात नागरिकांना महसूल विभागाचा सहारा वाटतो. कामाच्या विविधतेमुळेच अधिकारी / कर्मचा-यांची बुध्दीमत्ता, धाडस यांचा ख-या अर्थाने कस लागतो, असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.

नियोजन सभागृहात महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागातील कोतवालापासून तर जिल्हाधिका-यांपर्यंत सर्व जण, जनता आणि शासन यातील दुवा म्हणून काम करतात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, हा विभाग प्रशासनाचा मुख्य कणा आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात इतर विभागांशी समन्वय ठेवून महसूल विभागाला जबाबदारी पार पाडावी लागते. नागरिकांची सेवा करण्याची संधी महसूल विभागात आहे. कुठल्या अधिका-याला किंवा कर्मचा-याला कोणता टेबल मिळेल, हे निश्चित नाही. त्यामुळे कामाची विविधता या विभागात प्रचंड आहे. यात ख-या अर्थाने बुध्दीमत्तेची कसोटी लागते.

आपले राज्य हे कल्याणकारी असल्यामुळे जनतेचे प्रश्न, तक्रारी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी उत्तम टीम लागते. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचा मला अभिमान आहे. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या विभागाचा अभिमान बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामुळे महसूल विभागासमोर मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याला भविष्यासाठी तयार राहावे लागेल. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, कर्मचा-यांना प्रशिक्षित करणे, स्वत:मधील नेतृत्व विकसीत करणे, उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त काम करून घेणे आदी जबाबदा-या आपल्याला पार पाडाव्या लागणार आहे. एवढेच नाही तर कामामध्ये कधीकधी ताणतणाव येतो, त्यावर मात करून आपल्याला सामोरे जावे लागेल. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचारी आपापली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत असल्याचे श्रीमती वरखेडकर यांनी सांगितले. यावेळी इतरही अधिका-यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार यशवंत पवार, प्रवीण चिडे, सचिन पाटील, अव्वल कारकून राकेश जांभुळकर, के.डी.गोंडाणे, हेमंत तेलंग, प्रशांत रेभनकर, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, रविंद्र चिडे, संजय चिकटे, महसूल सहाय्यक प्रभाकर गिज्जेवार, निलम नगराळे, राजेश निखारे, तलाठी विशाल कुरेवार, राहुल श्रीरामवार, चंद्रकांत ठाकरे, शिपाई सुशीला ठाकरे, उमेशकुमार अलोणे, धनराज पेडूकर, कोतवाल मनोज वालदे, विनोद रामटेके, रमेश नैताम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर बल्लारपूरचे माजी तहसीलदार संजय राईंचवार हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 कार्यक्रमाचे संचालन अधिक्षक प्रिती डूडूलकर यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००००

No comments:

Post a Comment