जिल्ह्यात 16 ते 31 ऑगस्टदरम्यान हत्तीपाय व अंडवृद्धी रुग्णांची शोध मोहीम
Ø जिल्हास्तरीय हत्तीरोग विकृती व्यवस्थापन कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट: जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जिल्हास्तरीय हत्तीरोग विकृती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, नागपूर मंडळाचे आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण जिल्ह्यात दि. 16 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत हत्तीपाय व अंडवृद्धी रुग्णांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या कोणत्याही रुग्णांना हत्तीरोग व अंडवृद्धी असल्यास त्यांनी आपले नाव या मोहिमेत नोंद करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले. जिल्ह्यातील सर्व अंडवृद्धी रुग्णांची शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नि:शुल्क आयोजित करण्याबाबत तसेच प्रत्येक आरोग्य संस्थेत हत्तीरोग विकृती व्यवस्थापन क्लिनिक कार्यान्वित करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
सहाय्यक संचालक डॉ. निमगडे यांनी हत्तीपाय रुग्णांना असलेल्या सुजनच्या तीव्रतेवरून एकूण सात ग्रेडमध्ये विभाजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी यांनी हत्तीपाय रुग्णांचे पायधुनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले व सदर प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये जिल्हा हिवताप तथा हत्तीरोग अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रात हत्तीरोग व अंडवृद्धीकरीता प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती दिली, तसेच हत्तीरोग, त्यावरील उपचार व त्या आजाराच्या गांभीर्याबाबत सविस्तर माहिती दिली.
हत्तीपाय रुग्णांना वर्षातून दोन ते चार वेळा ताप येणे, पाय लालसर पडणे, दुखणे असे लक्षणे आढळून आल्यास त्याला अॅक्युट अटॅक असे संबोधण्यात येते. सदर अॅक्युट अटॅक हे जिवाणू बुरशीच्या लागणमुळे उद्भवतात. अॅक्युट अटॅक आल्यास हत्तीपाय रुग्णाने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून औषधोपचार करून घ्यावा. नियमित पायधुनी व अॅक्युट अटॅकचे योग्य उपचार केल्याने हत्तीपाय रुग्णांचा समोरील ग्रेडमध्ये जाण्यास प्रतिबंध करता येतो व अटॅक कमी होण्यास मदत होते.
तालुकास्तरावर हत्तीरोग विकृती व्यवस्थापन कार्यशाळा 15 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या सर्व रुग्णांची माहिती राज्यस्तरावरून कार्यान्वित होत असलेल्या पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय आणि हत्तीरोग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.
00000
No comments:
Post a Comment