प्राचिन वारसांचे जतन व संवर्धन हे आपले कर्तव्य
- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Ø नेफडो संस्थेला सोमेश्वर मंदिर परिसर दत्तक पत्र सुपूर्द
चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. तसेच दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान "स्वराज्य महोत्सव" चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पुरातत्त्वदृष्ट्या महत्वाचा वारसा स्थळांचे देखभाल व जपणूक करण्याकरीता राजुरा शहरातील प्रसिद्ध वारसा स्थळ असलेले श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला दत्तक देण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, संवर्ग विकास अधिकारी श्री. भिंगारदिवे उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या प्राचिन वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. नेफडो संस्थेमार्फत या परिसराची देखभाल, स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष बादल बेले यांना सोमेश्वर मंदिर परिसर देखभाल व जपणूक करण्याकरिता दत्तक देण्याचे अधिकृत पत्र देण्यात आले.
तत्पुर्वी नेफडो संस्था व नगर परिषदतर्फे सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नगर परिषद परिसरात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले. संचालन प्रशासकीय अधिकारी विजयकुमार जांभूळकर यांनी तर आभार संकेत नंदवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्युत अभियंता आदित्य खापणे, कर निरीक्षक उपेंद्र धामंगे, लेखापाल अश्विनकुमार भोई, रचना सहाय्यक अभिनंदन काळे, स्थापत्य अभियंता रवींद्र जामूनकर, प्रीतम खडसे, सनप जोशी, अक्षय सूर्यवंशी, नेफडोचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment