जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी
चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 10 कामांची पाहणी केली.
पाहणी करून वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत यंत्रणेचा आढावा घेतांना श्री. जैन म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जलसंधारणाचे काम अतिशय चांगले आहे. त्यातच अमृत सरोवराचे काम आणि दर्जा चांगला असून त्यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले. दैनंदिन घरगुती कामांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून पाण्याची बचत करण्यासाठी या अभियानात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. याकडे यंत्रणेने लक्ष द्यावे. तसेच केवळ काम करून उपयोग नाही तर पोर्टलवर ती कामे तातडीने अपलोड होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची दखल वरिष्ठांना घेता येईल. त्यामुळे कामे अपलोड करण्याबाबत गांभिर्य ठेवा. जेथे नागरिकांचा राबता जास्त आहे, अशा ठिकाणी जलशक्ती केंद्राचे मॉडेल उभारावे. त्यात आकर्षकपणा असावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
जुनोना येथील तलावाची पाणी साठवणक्षमता वाढू शकते, असे तांत्रिक अधिकारी श्री. शाहू यांनी सांगितले. पोंभुर्णा येथील मच्छी बाजारातील रेन वॉटर हार्वेस्टिंगकरीता तयार करण्यात कामामध्ये केवळ दोनच पाईपचा उपयोग केला आहे. ही पाईपची संख्या वाढवावी, असेही ते म्हणाले.
बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर, प्रियंका रायपुरे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी केंद्रीय पथकाने चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पठाणपुरा येथील पाणी शुध्दीकरण केंद्र, जुनोना येथील तलाव, किन्ही येथील बंधारा, बल्लारपूर येथील रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि डीजीटल शाळा, पोंभुर्णा येथील नगर पंचायत इमारत व आठवडी बाजार, चकाष्टा येथे वनविभागाचे वृक्षारोपण आणि तलाव आदी कामांची पाहणी केली.
००००००००
No comments:
Post a Comment