Search This Blog

Thursday 29 February 2024

आजपासून तीन दिवस चंद्रपुरात ताडोबा महोत्सव

 



आजपासून तीन दिवस चंद्रपुरात ताडोबा महोत्सव

Ø परिसंवाद, चर्चासत्रासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

चंद्रपूरदि. 29 :  जगप्रसिध्द ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयेाजन करण्यात आले आहे. 200 पेक्षा जास्त अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी हा भव्य महोत्सव होणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मार्च रोजी विविध सत्रे आणि प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. सुरवातीला वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता ग्रामविकास समितीचे सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांच्यासोबत मानव – वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा आणि निसर्ग  प्रश्नमंजुषा आयोजित आहे.  तसेच सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचा सँड आर्ट शो आणि श्रेया घोषाल यांची लाईव्ह संगीत संध्या कार्यक्रम होणार आहे.

2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता रामबाग कॉलनी, चंद्रपूर येथे रोपट्यांपासून जगातील सर्वात मोठी शब्दरचना ‘भारतमाता’ लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 वाजतापासून वन अकादमी येथे विविध चर्चासत्राचे आयेाजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे प्रसिध्द कवी कुमार विश्वास यांचे कविसंमेलन आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांचे संगीतसंध्या कार्यक्रम होणार आहे.

3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता वन अकादमी येथे सी.एस.आर. परिषद – सहयोगातून संवर्धन तर सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे समारोपीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र वनभुषण पुरस्कार व इतर पुरस्कार सोहळा आणि प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी आणि त्यांच्या संचातर्फे भारतातील नद्यांवर आधारीत ‘गंगा बॅलेट’ या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment