Search This Blog

Tuesday, 20 February 2024

मातंग समाजातील उमेदवारांकरीता विविध कर्ज योजना

 

मातंग समाजातील उमेदवारांकरीता विविध कर्ज योजना

Ø 11 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तसेच सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना एन.एस.एफ.डी.सी अंतर्गत सुरू झालेल्या आहेत.

या आहेत योजना 1)सुविधा कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा 5 लाखापर्यंत. लाभार्थी उद्दिष्ट 25 पर्यंत राहील. 2)महिला समृद्धी योजना:- प्रकल्प मर्यादा 1 लाख 40 हजार पर्यंत. लाभार्थी उद्दिष्ट 20 पर्यंत राहील. 3)शैक्षणिक कर्ज योजना : देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख, परदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख अनुज्ञेय राहील.

 योजनेअंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात सादर करावे. लाभार्थ्यांनी https://beta.slasdc/org. ह्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावे. अर्ज केल्यानंतर 3 प्रतीत मूळ कागदपत्रासह महामंडळाच्या कार्यालयात सादर करावेत. सदर कर्ज प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत 11 मार्च 2024 पर्यंत आहे.

आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराच्या जातीचा दाखला, उत्पन्न दाखला (उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत. तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), पासपोर्ट फोटो, राशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा, त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, एन.एस.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आरटीओ कडील प्रवासी वाहतूक परवाना, वाहनाचे दरपत्रक, व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, व्यवसायससंबंधी प्रकल्प अहवाल, खरेदी करावयाच्या मालाचे/साहित्याचे कोटेशन, यापूर्वी महामंडळाच्या योजनेचा व अन्य इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबत प्रतिज्ञापत्र तसेच कर्ज मंजुरीनंतर कर्ज परतफेडीच्या हमीसाठी 2 सक्षम जमानतदार आवश्यक राहील.

कर्ज मंजुरीनंतर 2 सक्षम जामीनदारांच्या वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता केल्यावरच कर्ज वाटप करण्यात येईल. सदर कर्ज योजनेचा लाभ मातंग समाजातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.व्ही. राचर्लावार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment