Search This Blog

Saturday 17 February 2024

सुखविंदरसिंगच्या तालावर थिरकली तरुणाई

 










सुखविंदरसिंगच्या तालावर थिरकली तरुणाई

Ø उपस्थितांचा प्रत्येक गीताला उत्स्फुर्त प्रतिसाद

Ø बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

चंद्रपूरदि.18 : ‘आजा आजा जींद शामियाने के तले....आजा जरी वाले नीले आसमान के तले...जय हो... ‘कुछ करीए, कुछ करीए...... नस नस मेरी खोले....चक दे....चक दे इंडिया’ अशा देशभक्ती आणि इतर जल्लोशपूर्ण गीतांना तरुण – तरुणी, गृहिणी, बच्चेकंपनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. निमित्त होते बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाचे. चार दिवसीय या कार्यक्रमाचा आगाज शनिवारी (दि.17) प्रसिध्द पार्श्वगायक सुखविंदसिंग यांच्या स्वरसंध्या या कार्यक्रमाने झाला आणि त्यांच्या प्रत्येक गीतावर तरुणाई अक्षरश: थिरकली.

बल्लारपूर शहराला 600 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासन आणि बल्लारपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द पार्श्वगायक सुखविंदसिंग यांच्या ‘स्वरसंध्या’ या कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. गायिका माधवी श्रीवास्तव यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाल्यावर सुखविंदरसिंग यांची स्टेजवर धमाकेदार एन्ट्री झाली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

आपल्या अनोख्या शैलीत ‘चल छैया छैया छैया छैया’….. ‘मैं प्रेम का प्याला पी आया….पल में सदिया जी आया’…. ‘होले होले से दुवा लगती है…..’ ‘बिडी जलाईले जीगर से पिया….जीगर में बडी आग है’….. ‘उडी उडी जाये, उडी उडी जाये….दिल की पंतग देखो उडी उडी जाये’…. अशी एकापेक्षा एक अप्रतिम आणि नागरिकांच्या आवडीची गाणे म्हणत सुखविंदसिंग यांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षकांनीही त्यांच्या प्रत्येक गीताला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुखविंदसिंग यांना गायिका माधवी श्रीवास्तव यांची सोबत होती. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुखविंदरसिंग यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.  

सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी विनय गौडा

कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने स्थानिक लोककला, संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. बल्लारपूर येथेही 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत चार दिवसीय महासंस्कृती महोत्सव नागरिकांसाठी करण्यात येत असून बल्लारपूरकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा व हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, तहसीलदार ओंकार ठाकरे, चंदनसिंह चंदेल, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

असे आहेत सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रम : 17 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बल्लारपूर येथील जुना क्रीडा संकूल येथे आयोजित महासंस्कृती व बल्लारपूर महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यात 17 फेब्रु. रोजी सुखविंदरसिंग यांची स्वरसंध्या, 18 रोजी वाघनृत्य, शिवमहिमा (नृत्य नाटक) आणि गर्जा महाराष्ट्र माझा, दि. 19 रोजी अशोक हांडे यांचे ‘आजादी – 75’ नाट्य आणि शेवटच्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी संस्कार भारती कार्यक्रम होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व बल्लारपूर नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment