Search This Blog

Friday 9 February 2024

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र


आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र

Ø 22 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 08 : वर्ग 3 व 4 पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षेची आदिवासी उमेदवारांकडून तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने साडेतीन महिन्यांचे स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे.

1 एप्रिल ते 15 जुलै 2024 या कालावधीत होणाऱ्या प्रशिक्षण सत्राकरीता अनुसूचित जमातीतील आदिवासी उमेदवारांनी 22 मार्च 2024 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील. अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी सदर अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात) तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक आदींचा उल्लेख करावा. अर्ज करण्याकरीता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 मार्च 2024 असून 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रसिध्द करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती (एस.टी.) (आदिवासी) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 दरम्यानचे असावे. उमेदवार किमान एच.एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका (एस.एस.सी / एच.एस.एस.सी / पदवी), आधारकार्ड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे नोंदणी कार्ड.

00000

No comments:

Post a Comment