पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातंर्गत कीडरोगांची निरीक्षणे
चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : कापूस, भात, सोयाबीन व तूर पिकांवर सद्य:स्थितीमध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे क्रॉपसॅप निरिक्षणावरून दिसून आले आहे. कापूस पिकामध्ये तुडतुडे व गुलाबी बोंडअळी वरोरा तालुक्यातील येन्सा, आष्टी, एकार्जुना, केकापूर, चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, धानोरा, अंतुर्ली, देवाडा, वेंडली व येरूर, बल्लारपूर तालुक्यातील दहेली, भद्रावती तालुक्यातील खंडाळा रीठ, पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा, कोरपना तालुक्यातील बीबी, थुतरा तर गोंडपिपरी तालुक्यातील व्यंकटपूर या गांवामध्ये मोठ्या प्रमाणात किडरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
भात पिकावर पिवळा खोडकिडा, गादमाशी व निळे भुंगेरी या रोगाचा प्रादुर्भाव नागभीड तालुक्यातील तळोधी, देवपायली व सोनूली चक तर ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगाव (ख.) गोडपिंपरी तालुक्यातील चक नांदगाव तर भद्रावती तालुक्यातील मेंढोली या तालुक्यात मोठया प्रमाणात आढळुन येत आहे. सोयाबीन पिकांवर उंट अळी व खोडमाशीचा प्रादुर्भाव राजुरा तालुक्यातील पाचगाव, गोवारी, चिमूर तालुक्यातील चिंचाळा व मानूसमारी तर तूर पिकांवर मररोग हा चंद्रपूर तालुक्यातील महा कुर्ला या भागात आढळुन येत आहे. या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होवू नये यासाठी शेतकरी बंधुनी आवश्यक उपायोजना करणे आवश्यक आहे.
या कराव्यात उपाययोजना:
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा वर्टीसीलीअम जलकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसीटामाप्रीड 20 टक्के, 60 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के 260 मिली प्रति एकर पाऊस नसतांना फवारणी करावी. शेंदरी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत. डोमकळी आढळल्यास नियमित दर आठवडयांनी अळीसहीत वेचून नष्ट करावे.
सोयाबीन पिकात अळया खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध “टि” आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता असून त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत. नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के ईसी 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भात पिकात पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50 टक्के प्रवाही 15 ते 16 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस नसतांना फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे व वाढत्या आद्रतेमुळे तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकिरी तुडतुडे दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम अनिसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावीत. तुर पिकात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता असून त्याच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी.
आपत्कालीन परिस्थितीत कीडरोगाबाबत किटकनाशके उपलब्ध करून देण्याचे नियोजन हे क्रॉपसॅप योजनेअंतर्गत केले जाते. कीडरोगाचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाययोजना या संदर्भात ग्रामस्तरीय ग्रामकृषि विकास समितीमध्ये चर्चा करुन उपाययोजना करण्यास सुचविण्यात येणार आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठण्यापुर्वीच उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याने किटकनाशकांचा वापर कमी करण्यात येणार आहे. तसेच जैविक कीटकनाशकांचा वापर वाढवून रासायनीक किटकनाशकाचा खर्च कमी करण्यात येणार आहे.
क्रॉपसॅप योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment