Search This Blog

Friday 23 September 2022

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला 310 कोटी 98 लक्ष रुपये प्राप्त

 


अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला 310 कोटी 98 लक्ष रुपये प्राप्त

चंद्रपूर, दि. 23 सप्टेंबर : जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला आता 310 कोटी 98 लक्ष 914 रुपयांचा निधी 22 सप्टेंबर 2022 रोजी प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीकरीता बाधित शेतक-यांना मदत देण्यासाठी 302 कोटी रुपयांची आणि वाढीव 8 कोटी 95 लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याला आता 310 कोटी 98 लक्ष 914 रुपये प्राप्त झाले आहे.

यात बल्लारपूर तालुक्यासाठी 8 कोटी 81 लक्ष रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यासाठी 24 कोटी 34 लक्ष, नागभीड 1 कोटी 6 लक्ष, चंद्रपूर 20 कोटी 95 लक्ष, चिमूर 41 कोटी 68 लक्ष, सिंदेवाही 51 लक्ष, गोंडपिपरी 9 कोटी 64 लक्ष, पोंभुर्णा 5 कोटी 86 लक्ष, मूल 17 कोटी 40 लक्ष, सावली 16 कोटी 5 लक्ष, जिवती 10 कोटी 86 लक्ष, कोरपना 13 कोटी 2 लक्ष, राजुरा 16 कोटी 25 लक्ष, भद्रावती 45 कोटी 26 लक्ष आणि वरोरा तालुक्यासाठी 79 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

सदर निधी तहसीलदार यांना तालुकानिहाय अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. तहसीलदार यांनी शासन निर्णय व शासन पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार अटी व शतीच्या अधीन राहून निधी तातडीने वितरीत करावा. सदर रकमेचे वाटप पूर्ण झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे एकूण 2 लक्ष 21 हजार 900 हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे नुकसान झाले होते. यात बाधित शेतक-यांची संख्या 2 लक्ष 30 हजार 362 असून एकूण बाधित गावांची संख्या 1382 आहे.

०००००००

No comments:

Post a Comment