Search This Blog

Monday 12 September 2022

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून, ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरीत सादर करावा. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतिसोबत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.

हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडेसुध्दा सदर हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment