इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø महापालिका आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त सर्व्हे करण्याच्या सुचना
चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : इरई नदी ही चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. पूर परिस्थितीमध्ये इरईचे पाणी शहरात येत असल्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. शहरात असेही काही भाग आहेत, जेथे ब्ल्यू लाईन आहे, मात्र वर्षानुवर्षे तेथे पाण्याचा एकही थेंब अजून पोहचला नाही. त्यामुळे याबाबत नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ब्ल्यू लाईन मुळे शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
नियोजन सभागृहात चंद्रपूर शहरातील पूर नियंत्रण रेषा संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. पाटील, कार्यकारी अभियंता श्री. काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.
इरई नदीच्या रेड आणि ब्ल्यू लाईनबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटी यांनी सर्व्हे केला होता, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनंगटीवार म्हणाले, सध्या चंद्रपूर शहरात रेड लाईन ही 181.10 मीटर तर ब्ल्यू लाईन ही 179.6 मीटरवर आहे. ज्या जमिनीवर कधीच पाणी आले नाही, अशा ही काही जमिनी ब्ल्यू लाईनमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र ब्ल्यू लाईनमुळे बाधित होते. हे क्षेत्र मोठे आहे. विनाकारण नागरिक यात भरडले जाऊ नये. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा सामूहिक सर्व्हे करून व्यवस्थित टिपणी तयार करावी. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल. आयआयटीने केलेल्या सर्व्हेची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरात 3 सप्टेंबर 1891 रोजी आलेल्या पुराची पठाणपुरा गेटवर 183.06 मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै 1913 मध्ये 180.06 मीटर, ऑगस्ट 1958 मध्ये 181.33 मीटर, सप्टेंबर 1959 मध्ये 180.89 मीटर, ऑक्टोबर 1986 मध्ये 180.76 मीटर मार्किंग असल्याची माहिती अधिक्षक अभियंता श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.
०००००००
No comments:
Post a Comment