Search This Blog

Tuesday 13 September 2022

खेळण्याच्या माध्यमातून ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड





 खेळण्याच्या माध्यमातून ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार

                                         – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड

Ø डीईआयसी विभागात जागतिक फिजीओथेरपी दिन साजरा

चंद्रपूरदि. 13 सप्टेंबर : जिल्हा रुग्णालयातील डिस्ट्रीक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर (डीईआयसी) मध्ये    येणा-या बालकांना खेळण्याच्या माध्यमातून फिजीओथेरपी करण्याकरीता भरपूर साहित्य व साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे बालकांना हसत खेळत उपचार मिळत असून त्याचे प्रभावी परिणाम बालकांवर दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या मुलांच्या चेह-यावर आनंद झळकतो, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विभागातील ‘4 डी’ च्या बालकांसोबत जागतिक फिजीओथेरपी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. डॉ. राठोड पुढे म्हणाले, डीईआयसी विभागामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील ‘4 डी’ बालकांवर उपचार केले जातात. यामध्ये विकासात्मक वाढीतील दोष (डेव्हलपमेंटल डीले), जन्मत: असणारे व्यंग (डिफेक्ट्स ॲट बर्थ), बालपणातील व त्यानंतर असलेले आजार (डिसीजेस) आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार (डिफीशिएन्सी) यांचा समावेश होतो. आधुनिक काळात फिजीओथेरपी अत्यंत प्रभावी चिकित्सापध्दती आहे. मनुष्याला क्रियाशील व आनंददायी जीवन जगण्याकरीता फिजीओथेरपी आवश्यक आहे. ‘4 डी’ च्या जास्तीत जास्त बालकांनी डीईआयसी विभागातील सेवांचा लाभ घेऊन सदृढ व्हावे. त्यासाठी पालकांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.  

यावेळी डीईआयसी विभागाच्या व्यवस्थापक तथा फिजिओथेरपिस्ट डॉ. अश्विनी जुलमे म्हणाल्या, फिजीओथेरपी ही औषधविरहीत चिकित्सापध्दती आहे. तसेच ही थेरपी नियमितपणे केल्यास विकासात्मक वाढीतील दोषांमध्ये नक्कीच सुधारणा दिसून येते. यावेळी डॉ. लिना अवचट यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. फिजीओथेरपी दिनानिमित्त सदर विभागामध्ये ‘4 डी’ अंतर्गत बालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खेळता खेळता बालकांवर भौतिकोपचार करणे व त्यातून बालकांना आनंद मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे संचालन अतुल जुगनाके यांनी तर आभार जयप्रकाश हाडके यांनी मानले. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. सचिन बिलवणे, डीईआयसी विभागाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकट पंगा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या जाधव यांच्यासह डीईआयसी विभागातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment