Search This Blog

Monday, 12 September 2022

जिल्ह्यात आजपासून क्षयरोग व कुष्ठरोग संयुक्त शोध मोहीम-जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 

जिल्ह्यात आजपासून क्षयरोग व कुष्ठरोग संयुक्त शोध मोहीम

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 12 सप्टेंबर : जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग तसेच सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्यस्थितीत सक्रीय क्षयरुग्ण जवळपास 1700 असून कुष्ठरोगाच्या क्रियाशील रुग्णांची संख्या 937 आहे. या मोहिमेसाठी एकूण 1513 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून 3 लक्ष 99 हजार 125 घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण शोधणे व त्यांचा उपचार हा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील 15 लक्ष 87 हजार 525 आणि शहरी भागातील 2 लक्ष 17 हजार 597 असे एकूण 18 लक्ष 5 हजार 122 नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 303 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

मोहिमेचा उद्देश व पध्दती (कुष्ठरोग) : समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे आणि कुष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.

क्षयरोग : क्षयरोगाचे निदान न झालेल्या समाजातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे. माहिमेमध्ये प्रशिक्षीत पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणा-या व्यक्तिंना शोधणे. संशयीत क्षयरुग्णांची थुंकी नमुने व एक्स – रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरू करणे.

कुष्ठरोगाची लक्षणे : 1) त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, 2) जाड, बधीर, तेलकट / चकाकणारी त्वचा, 3) त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, 4) भुवयांचे केस विरळ होणे,  डोळे पूर्ण बंद करता न येणे, 5) तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, 6) हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, 7) त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, 8) हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालतांना पायातून चप्पल गळून पडणे. 

क्षयरोगाची लक्षणे : दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ.

वरील पैकी कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास त्यास संशयित क्षयरुग्ण म्हणून नोंद करावी.

००००००

No comments:

Post a Comment