अतिवृष्टीत नागरिकांनी दक्षता घेण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सुचना
चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर : संततधार पावसामुळे वैनगंगा व वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प आणि बेंबळा नदीवरील बेंबळा प्रकल्प या धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हयात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा ऑरेंज व यलो अलर्ट, वैनगंगा व वर्धा नदीच्या पाण्याची वाढती पातळी व नैसर्गिक वीज पडून होणारी जिवीत व वित्त हानी टाळणेकरीता पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणा-या ठिकाणी थांबू नका.
वादळ वारा/विजा चमकत असल्यास घरात असताना काय करावे : घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा. घराचे दरवाजे खिडक्या, कुंपण पासून दुर रहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिट घरातच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे प्रस्थान करावे. ट्रकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दुर रहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून दूर लावा. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या, धातू पासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रयस्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान, झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. जंगलामध्ये दाट लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवरः दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणा-या पूरापासून सावध रहा.)
जर जमिनीच्या वर पाणी असल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.
वादळ वारा/विजा चमकत असल्यास घरात असताना काय करू नये : गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुंचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रानिक/इलेक्ट्रीकल उपकरणे विद्युत जोडणीस लावु नये. (अशा आपातकालीन वेळी कॉर्डलेस व वासरलेस फोनचा वापर करावा परंतू ते भिंतीला जोडलेले नसावे.) गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे ही कार्ये करू नयेत. कांक्रिटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहु नये. प्रवाहकीय पृष्टभागांशी संपर्क टाळावा. (धातुची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग/नळ)
घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नका. वाहनांच्या धातु किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या/लोंबणा-या (Cables) पासून लांब रहा. नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
०००००
No comments:
Post a Comment