Search This Blog

Friday 30 September 2022

महाविद्यालयास देय शिक्षण शुल्काची रक्कम जमा करण्याचे आवाहन


महाविद्यालयास देय शिक्षण शुल्काची रक्कम जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली शिक्षण शुल्काची 60 टक्के रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयाकडे जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीकरीता माहे मार्च 2021 पासून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून सुधारित निधी वितरण कार्यपद्धती राज्यभरात अवलंब करावयाची आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत मंजूर झाल्यानंतर त्या शैक्षणिक वर्षाची अनुज्ञेय शिष्यवृत्ती रक्कम केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्याचे वितरण महाडीबीटी प्रणालीवर निश्चित करण्यात येते.

ही मंजूर करण्यात आलेली संपूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर ना परतावा शुल्क आदी) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाहभत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रकमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के या प्रमाणात लाभाची रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेला केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत केलेल्या अर्जानुसार त्यांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यामध्ये थेट केंद्र शासनामार्फत डीबीटी तत्त्वावर वितरित करण्यात आला आहे.

०००००००

No comments:

Post a Comment