अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तलाठीकडे
बैंक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 25 सप्टेंबर : जून, जुलै आणि ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदान हे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून त्यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडे बँकेचे खाते नंबर तात्काळ जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले होते. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला 310 कोटी 98 लक्ष 914 रुपयांचा निधी 22 सप्टेंबर 2022 रोजी प्राप्त झाला आहे.
सदर निधी तालुक्यांना वर्ग करण्यात आला असून त्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपला बैंक खाते क्रमांक त्वरित तलाठी यांच्याकडे द्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
तालुक्यांना वितरीत करण्यात आलेला निधी :
बल्लारपूर तालुक्यासाठी 8 कोटी 81 लक्ष रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यासाठी 24 कोटी 34 लक्ष, नागभीड 1 कोटी 6 लक्ष, चंद्रपूर 20 कोटी 95 लक्ष, चिमूर 41 कोटी 68 लक्ष, सिंदेवाही 51 लक्ष, गोंडपिपरी 9 कोटी 64 लक्ष, पोंभुर्णा 5 कोटी 86 लक्ष, मूल 17 कोटी 40 लक्ष, सावली 16 कोटी 5 लक्ष, जिवती 10 कोटी 86 लक्ष, कोरपना 13 कोटी 2 लक्ष, राजुरा 16 कोटी 25 लक्ष, भद्रावती 45 कोटी 26 लक्ष आणि वरोरा तालुक्यासाठी 79 कोटी 23 लक्ष रुपये.
०००००००
No comments:
Post a Comment