Search This Blog

Wednesday, 7 September 2022

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विधवा महिलांचा तालुकास्तरीय महिला मेळावा




 

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विधवा महिलांचा तालुकास्तरीय महिला मेळावा

चंद्रपूरदि. 7 सप्टेंबर : मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 च्या संसर्गामूळे एक पालक व द्विपालक गमावलेल्या बालकांचे न्याय व हक्क अबाधित राहावे, वंचितांना तात्काळ लाभ देण्याकरीता तसेच विधवा महिलांना कौशल्य विकास मार्गदर्शनाकरीता तालुकास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते उदघाटन झाले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसिलदार रोशन मकवाने, नायब तहसिलदार (संगायो) मधुकर काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. मुंजनकर, पुरवठा विभागाचे नंदकिशोर मांडवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वंचित बालकाचे न्याय व महिलांचे हक्क याबाबत उपस्थितांना माहिती देत मार्गदर्शन केले. नायब तहसिलदार (संगायो) मधुकर काळे यांनी विशेष सहाय्य योजनेच्या विविध लाभांबाबत माहिती दिली.

मेळाव्याचे प्रास्ताविक तहसिलदार रोशन मकवाने यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत तालुकास्तरीय कृतीदल समिती कडून वंचित लाभार्थ्यांना तहसिल कार्यालयामार्फत विविध लाभ मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा / संजय गांधी निराधार (विधवा) या लाभार्थ्यांना 50 पैकी 26 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 13 पैकी 12 पात्र लाभार्थ्यांना लाभ, जमीन मालमत्ता 05 पैकी 04 प्रकरणात फेरफार, बालसंगोपण बाबत 35 पैकी 34 लाभार्थ्यांना लाभ, शैक्षणिक मदत 50 पैकी 50 लाभार्थ्यांना देण्यात आली.  नविन बँक खाती काढण्यात आली. आधार नुतनीकरण व आधार लिंक करण्यात आले. 20 पैकी 20 लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले. सदर महिला मेळाव्याला मार्गदर्शक शशीकांत मोकाशी यांनी उपस्थित महिलांना कौशल्य विकास योजनांची तसेच अर्थ सहाय्य विषयक माहिती देत मार्गदर्शन केले.         

यावेळी, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, सेतू सुविधा प्रमाणपत्र,शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच मनरेगा आदी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. बालविकास प्रकल्प अधिकारी ए.के. मरस्कोल्के यांनी सदर महिला मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. या महिला मेळाव्याला  तालुका गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, तालुका कृषी अधिकारी भोयर, कृषी मंडळ अधिकारी श्री.काळे, गटशिक्षणधिकारी श्री.चहारे तसेच तालुक्यातील विविध गावातील सुमारे 85 महिला लाभार्थी तसेच सर्व सबंधित शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment