पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
Ø 108 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड
चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 सप्टेंबर रोजी डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, प्राध्यापक सतीश पेटकर , किशोर महाजन , प्राध्यापक श्री. चिमुरकर तसेच कौशल्य विकास विभागाचे शैलेश भगत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दहेगांवकर याच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका असा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यानी शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर भर द्यावा आणि मिळेल तो रोजगार करून आपला शालेय खर्च स्वत: करावा, असे यावेळी सांगितले. भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्यानी स्वत:मधील कौशल्य ओळखून रोजगाराच्या संधीसाठी प्रयत्न करावे. तसेच विद्यार्थ्यांनी मनामध्ये कसलाही संकोच न ठेवता मिळेल ते काम करून आपण कार्यक्षम असल्याचे सिद्ध करावे, विद्यार्थ्याने फक्त नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयंरोजगाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमामध्ये स्थानिक तसेच बाहेर जिल्ह्यातील नामांकित कंपन्या उपस्थित होत्या. या सर्व उद्योजकांनी आपल्या कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 108 उमेदवारांनी आपला बायोडाटा संबंधित कंपनीला दिला असून त्यापैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड झाल्याचे उद्योजकांनी कळविले आहे. अंतिम निवडीसाठी उमेदवारांना कंपनी बोलविणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. चिमुरकर यांनी तर आभार प्रा. पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी व डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.
०००००००
No comments:
Post a Comment