Search This Blog

Friday 30 September 2022

नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन


नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 सप्टेंबर : सणासुदीच्या दिवसात तसेच नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून खाताना, काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहे. त्यामुळे भगर खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. भगर हा भरड धान्याचा एक प्रकार आहे. भगर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचा वापर केला जातो. भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून भगरचे प्रकार पडतात. यात वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर यांचा समावेश आहे. वरई भगर सर्वात उच्च प्रतीची तर कोद्रा भगर सर्वात हलक्या प्रतीची समजली जाते. भगरीमुळे कार्बोहायड्रेट आदी तंतुमय पदार्थ मिळतात, जे आरोग्यदायी असतात.

भगरीचे ग्लायकोमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह रुग्णांसाठी भगर हा उत्तम आहार आहे. अशी सत्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक का ठरते आहे, या प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने अभ्यास केला असून भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पारीगिल्स प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. त्यामुळे भगरीचे पीठ विकत आणू नये.

भगर खरेदी करतांना अशी घ्या काळजी :

भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक अथवा नोंदणीधारक व्यक्तींकडूनच खरेदी करावी. भगर किंवा उपवासाचे पदार्थ पॅकबंद असलेलेच विकत घ्यावे. भगरीच्या पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावे. पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो, तो नीट पाहून घ्यावा. त्याशिवाय बेस्ट बिफोर डेट म्हणजे भगरीची अंतिम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासून आणि खात्री करूनच खरेदी करावी. भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून किंवा हात गाडीवरून विकत घेऊ नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून आणि नंतर स्वच्छ धुऊन घ्यावी, त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी किंवा शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येऊ नये. भगर आणि इतर उपवासाचे पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत, आणि ते करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. 25 ते 32 सेल्सिअस तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते.

अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी कोणतीही माहिती, तक्रार व सूचना असल्यास एफ.डी.ए.च्या 1800222365 या हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अन्न व्यवसायिकांनी तसेच ग्राहकांनी याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नि.दि. मोहिते यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment