अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
Ø तपासणीकरीता रुग्णांचे नमूने प्रयोगशाळेत
चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात उलटी, हगवणचे रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणावरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आजपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांचे प्रकृती स्थिर आहे.
याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत गावामध्ये आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी गावामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन गावातील परिस्थितीची पाहणी केली, तसेच मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाच्या चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. रुग्णांची आरोग्य तपासणी गावातील अंगणवाडी केंद्रात लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात करण्यात येत आहे व नागरिकांना औषधोपचार देण्यात येत आहे.
7 सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीमध्ये एकूण 21 रुग्ण तर 8 सप्टेंबर रोजी एकूण 11 हगवण व उलटीची लक्षणे असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व शिबिरामध्ये औषधोपचार करण्यात आला. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या नियंत्रणात असून गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 5 पाणी नमुने, 1 ब्लिचिंग पावडर नमुना तसेच 8 रुग्णांचे सौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येत असून नागरीकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत गावातील एकूण 120 कुटुंबाच्या घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून जीवनड्रॉप बॉटलचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरामध्ये व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारामध्ये तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, किंवा नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment