सेवा पंधरवडा अभियानांतर्गत तालुकास्तरावर आठवड्यातून दोन दिवस विशेष शिबीर - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Ø नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर : राज्य शासनाच्या सुचनेनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत 10 सप्टेंबर 2022 पर्यंत विविध विभागांकडे असलेले नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी आदी निकाली काढण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस (बुधवार आणि शनिवार) म्हणजे 21, 24, 28 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले जाईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा पंधरवडा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा उपायुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, तहसीलदार नीलेश गौंड, यशवंत धाईत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जनतेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आठवड्यातून बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सदर शिबिर 21, 24, 28 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. 10 सप्टेंबर 2022 पर्यंत विविध विभागाकडे तसेच संबंधित विभागाच्या पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज येत्या 15 दिवसांत 100 टक्के निकाली काढण्यासाठी सर्वांनी गांभिर्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लाभ व प्रमाणपत्र मिळालेले लाभार्थी : चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने इमरोज खान आसिफ खान, रेखा चौधरी, पंकज मिश्रा, भगवान चहारे, शुभम धकाते यांना दिव्यांग ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
कृषी विभाग लाभार्थी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ या उपक्रमांतर्गत जीवन येरमे, तानिबाई येरगुडे, मारोती नक्षिणे, दिलीप नक्षिणे, शैलेंद्र कक्कड यांना विमा प्रमाणपत्र वाटप.
महावितरण लाभार्थी : आशुतोष सरकार, लतिबुद्दीन शेख, चंद्रावणी कराड, पिंटू पोपटकर, सुधाकर वनकर, आदर्श पुजारी, मोनिका पिसे यांना नवीन वीज जोडणीचे प्रमाणपत्र वाटप.
चंद्रपूर तहसील कार्यालय लाभार्थी : देवराव ताजणे, शंकर ताजणे, अर्जुन नागरकर, शांताराम हेलवडे, चेतन गौंड यांना डीजीटल सातबारा तर प्रकाश कुचनवार, सतिश चौधरी, स्वाती शेंडे यांना उत्पनाचे प्रमाणपत्र वाटप.
चंद्रपूर पंचायत समिती लाभार्थी : पायल तांबे, अर्चना मेश्राम यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रिया टेंभुर्णे, यश थोरात यांना जन्म नोंदणी प्रमाणपत्र, देवकुमार भगत, प्रिती जुनघरे यांना मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र तर चंदू भगत यांना दारिद्र रेषेखाली कुटुंबाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment