गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
आवश्यक उपाययोजना राबवा
Ø जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश
Ø कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाचाही आढावा
चंद्रपूर दि. 14 : कापसाचे पीक शेतक-यांच्या हातात येण्याचा हा हंगाम आहे. मात्र गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हे पीक हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासंदर्भात कृषी विभागाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जि.प. कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे, सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी वर्षा बागडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात ज्या क्षेत्रात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा क्षेत्रात कृषी विभागाने गांभिर्याने लक्ष केंद्रीत करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी जिनिंग मीलच्या प्रतिनिधींची नियमित बैठक घ्यावी. वेचणी केलेला कापूस जिनिंग व प्रेसिंग मिलमध्ये आल्यावर त्यात अडकलेले पतंग, सरकीतील अळ्या व कोष नष्ट करण्यासाठी जिनिंगची भूमिका महत्वाची आहे. याठिकाणी गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी जिनिंग चालकांनी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषत: वरोरा,भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना या भागात कापूस पिकाचे पेरणी क्षेत्र जास्त असल्याने तेथे कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी श्री. बऱ्हाटे यांनी 2022-23 या वर्षात गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे : कपाशीच्या फरदडीखालील क्षेत्रात झालेली वाढ, वर्षभर कपाशीचे पीक घेणे, किडीच्या जीवनक्रमात खंड नसणे. जिनिंग मिल व बाजारात अळ्या व कोषासह कापूस जाणे, शेतात कपाशीच्या पऱ्हाट्याची वेळेवर विल्हेवाट न लावणे, केवळ कापूस, भेंडी व अंबाडी याच वनस्पींचे पीक घेणे, आश्रय ओळी न लावणे. वेगवेगळ्या कालावधीचे 250 पेक्षा जास्त संकरीत वाणाचा वापर आदी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे आहेत.
असे करा गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन : कपाशीचे फरदळ घेण्याचे टाळावे. हंगाम संपल्यानंतर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. शेतातील पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावे व पुढील हंगामाअगोदर सर्व पऱ्हाटीचा नायनाट करावा. अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपुर्वी किंवा नंतर घेऊ नयेत व पिकांची फेरपालट करावी. कपाशी पिकात आश्रय ओळी लावाव्यात. पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंडळीसाठी हेक्टरी किमान पाच कामगंध सापळे वापरावे. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावे. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 120 ते 130 दिवसाचे झाल्यावर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड कपाशीत लावावेत. गुलाबी बोंडअळी ही बोंडामध्ये असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, त्यामुळे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी शेतीसाठी पाण्याचा स्रोत वाढवणे तसेच एकत्रित कृषी विकास कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या.
०००००००
No comments:
Post a Comment