Search This Blog

Thursday, 17 November 2022

उपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या "मॅरेथॉन" बैठका

 




उपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या "मॅरेथॉन" बैठका

आठवड्याभरात नऊ तालुक्यांना भेटी व यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 17 : महिनाभरापूर्वी जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे कामकाजाबाबत ॲक्शन मोडवर असून त्यांनी उपविभाग स्तरावर मॅरेथॉन बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. आठवडाभरात तब्बल नऊ तालुक्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला.

10 नोव्हेंबर रोजी वरोरा आणि भद्रावती तालुका, 11 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर आणि मूल, 15 नोव्हेंबर रोजी चिमूर आणि सिंदेवाही तर आज (17 नोव्हेंबर) रोजी राजुरा, कोरपना आणि जिवती या तालुक्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

गुरुवारी जिवती येथील तहसिल कार्यालयात राजुरा उपविभागाचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या विभागाशी निगडीत प्रलंबीत कामांचा निपटारा त्वरीत करा. यावेळी जिल्हाधिका-यांनी महाराजस्व अभियान, भुसंपादन, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजनेतील कामांची माहिती घेतली व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महसुली वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी राजुरा उपविभागातील महसुल विभागाशी संबंधीत माहितीचे सादरीकरण केले. बैठकीला राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय वन अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच राजुरा, कोरपना व जिवती चे तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य़धिकारी, तालुका आरोग्य़ अधिकारी, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000


No comments:

Post a Comment