Search This Blog

Wednesday 30 November 2022

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

            जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे च्या वतीने सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (पुरुष एक व महिला एक), सर्वोत्कृष्ट गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व सर्वोत्कृष्ट गुणवंत क्रीडा संघटक असे पुरस्कार दिले जातात.

पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक राहील. क्रीडा संघटक म्हणून सतत 10 वर्ष महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले असले पाहिजे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. तसेच अर्ज करीत असताना 16 ऑक्टोंबर 2017 च्या शासन निर्णयात नमूद जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये दहा हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेले खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांना दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात माननीय नामदार तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment