मॉक ड्रिल प्रात्यक्षिकातून अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 16 : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. आणि त्यांची क्षमता बांधणी करण्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होत प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले.
याप्रसंगी राष्ट्रीय संरक्षण व बचाव दलाचे निरीक्षक बिपीन सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक शरद ढोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, अग्नीशमन दलाचे अंकुश धोपटे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा पूरग्रस्ताच्या यादीत येत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार येथे 15 व 16 नोव्हेंबर असे दोन दिवस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम यांच्या उपस्थितीत पुर्वतयारीच्या अनुषंगाने चर्चा व प्रश्नोत्तरातून मौखिक माहिती देण्यात आली. तर आज घुग्गुस तालुक्यातील धानोरा गावात वर्धा नदीच्या पात्रात पूर परिस्थिती हाताळणे आणि बचाव कार्यासंबंधी मॉक ड्रिल प्रात्यक्षीक आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय संरक्षण व बचाव दलामार्फत यावेळी पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर कसे काढावे, बोट कशी तयार करायची, त्यात हवा भरणे, बोटीत स्थानीक परिसराची माहिती असणाऱ्याचा समावेश करणे, बोट पलटल्यास कशी सरळ करावी, बुडणाऱ्या व्यक्तीला चिन टु पद्धतीने म्हणजे त्याने वाचवणाऱ्याला घट्ट पकडू नये यासाठी मागून त्याची हनुवटी व दोन पायांमध्ये पकडने, डबल हॅण्ड पद्धतीने उचलून आणणे, आपत्तीग्रस्ताच्या पोटात गेलेले पाणी काढणे याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच पूर परिस्थितीत लाईफ जॅकेट नसल्यास रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल, कोरडे नारळ, तेलाचे डबे, कॅन आदि घरातील साधनाचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. पोहता येत नसतांनाही दोर, बांबू किंवा कपडे याद्वारे बुडणाऱ्याला वाचविण्याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
पाण्यात बुडून हृदयाचे ठोके बंद पडले असल्यास गोल्डन अवर मध्ये हृदयावर दबाव देवून सी.पी.आर. पद्धतीने श्वासोश्वास कसा सुरू करावा याबाबत प्रात्याक्षीकेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यात जीवंत व्यक्तीला म्हणजे नाडीचे ठोके सुरू असणाऱ्या व्यक्तीला कधीही सी.पी.आर. देण्याची चुक करण्यात येवू नये असेही त्यांनी बजावले.
प्रशिक्षणात बचाव दलाचे कुंदन राउत, संजय पटले, विनोद गावंडे, प्रविण गावित, विनोद सिंघाने, संदिप अभ्यंकर, जितेंद्र बारिया यांनी प्रात्याक्षिक करून दाखवले. यावेळी महसूल, पंचायत, शिक्षण, सार्वजानिक बांधकाम, पोलीस , होमगार्ड, आरोग्य, विद्युत, जलसंधारण आदि विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
००००००
No comments:
Post a Comment