Search This Blog

Tuesday, 22 November 2022

शुभमंगल विवाह योजनेचा घ्या लाभ

 

शुभमंगल विवाह योजनेचा घ्या लाभ

शेतकरी, शेतमजुर, निराधार, परित्यक्ता,

विधवा महिलांना मुलीच्या विवाहासाठी दहा हजार अनुदान

चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, निराधार, परित्यक्ता, विधवा महिलांना त्यांच्या मुलींचा नोंदणीकृत किंवा सामुहिक विवाह करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून शुभमंगल योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत वार्षिक एक लाख रूपये कमाल उत्पन्न मर्यादा असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी प्रति जोडपे रूपये दहा हजार अनुदानाचा लाभ विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

सदर योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थी विवाह नोंदणी कार्यालयात विवाह करून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करू शकतात. सामुहिक विवाह (5 ते 100 जोडप्यांच्या मर्यादेत) आयोजन करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस प्रोत्सानपर प्रती जोडप्यामागे रुपये दोन हजार प्रमाणे विवाहाच्या आयोजन व विवाह समारंभाचा अनुषंगिक खर्च तसेच विवाह नोंदणी खर्च भागविण्यासाठी देण्यात येतो. यासाठी सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयास अर्जासह सादर करणे आवश्यक राहील.

तरी जिल्ह्यातील सामुहिक विवाह सोहळा आयोजन करणाऱ्या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थानी विहीत नियमान्वये शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्ता, विधावा महिलांच्या मुलींचे विवाह आयोजन करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव किमान एक महिन्यापुर्वी अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावे. तसेच अधिक माहितीकरिता कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment