Search This Blog

Thursday 16 May 2024

परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणांची खरेदी करा


परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणांची खरेदी करा

Ø दलाल किंवा अनधिकृत बियाणांबाबत तक्रार करण्याचे आवाहन

           चंद्रपूरदि. 15 : बीटी  कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित  वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो तर येणारे उत्पन्न हे पिकांचे व्यवस्थापन तसेच जमिनीच्या मगदूरावर/ सुपीकतेवर अवलंबून असते. तुलनात्मक गुणधर्म व क्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रामध्ये उपलब्धता असून एमआरपी दरामध्ये गुणात्मक बियाण्याची खरेदी करून शेतक-यांनी लागवडीच्या खर्चात बचत करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

            अशी करा कपाशी बियाण्याची निवड : कपाशीचे वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व गुणधर्म याचा विचार करावा. सर्व प्रकारच्या हवामानास  व जमिनीस अनुकूल वाण असावे. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी मध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. बोंडाचे  आकार बागायती लागवडीसाठी  मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. या गुणधर्माप्रमाणे मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वत: इतर शेतकऱ्यांच्या कपाशीच्या वाणाची निवड करावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायदा  होईल.

            सध्या बाजारात विविध कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे उपलब्ध आहे. यासर्व वाणांमध्ये विशेष  फरक नसून एखाद्या विशिष्ट वाणांची  मागणी करू नये किंवा जादा दराने खरेदी करू नये. तसेच खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. बाहेर राज्यातून किंवा दलाला मार्फत बियाणे खरेदी टाळावे. याबाबत काही तक्रार असल्यास अथवा अनधिकृतरित्या कोणीही विक्री करत असल्यास टोल फ्री क्रमांक 7498655232 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तोटावार व कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment