25 ते 29 एप्रिल कालावधीत विद्यार्थ्यांचा इसरो(बंगलोर) शैक्षणिक दौरा
Ø शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी
चंद्रपूर, दि. 26: मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेमार्फत नवरत्न स्पर्धेच्या निवड प्रक्रियेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इसरो (बंगलोर) येथे दि. 25 ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या शैक्षणिक दौऱ्याकरीता जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थी इसरो दौऱ्याकरीता रवाना झाले. इसरो दौऱ्याकरीता जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे, संशोधक व चिकित्सक व्हावे, परीक्षेत केवळ गुण मिळाले पाहिजे असा अट्टहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन कसे जगता येईल? यादृष्टीने प्रयत्नशील असावे, असा मोलाचा सल्ला दिला. प्रवासाचा आनंद घ्यावा व सोबतच आरोग्य सांभाळणे अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना व सोबत जाणाऱ्या शिक्षकांना दिल्या.
याप्रसंगी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूळकर आधी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या इसरो दौऱ्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) विशाल देशमुख यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे व निकिता ठाकरे, गटशिक्षणाधिकारी व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी:
सदर इसरो (बेंगलोर) दौऱ्यादरम्यान शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेटी देण्याकरीता अभ्यास दौऱ्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे. 26 एप्रिल 2023 रोजी बेंगलोर पॅलेस, लालबाग बॉटनिकल गार्डन, टिपू सुलतान समर पॅलेस व गव्हर्नमेंट म्युझियम, 27 एप्रिल रोजी इसरो (बेंगलोर), बेंगलोर फिल्म सिटी, जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम व बेंगलोर एक्वेरियम, 28 एप्रिल रोजी एचएएल एरोस्पेस म्युझियम, बनरघट्टा नॅशनल पार्क, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तर 29 एप्रिल रोजी बेंगलोर सायन्स म्युझियम, मैसूर फॅन्टॅसी पार्क, मैसूर स्नो सिटी व मैसूर पॅलेस असे दौऱ्याचे स्वरूप राहणार आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळ विषयक ज्ञानात भर पडेल त्याचप्रमाणे परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती संग्रहित करता येईल पर्यावरण व इतर भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment