Search This Blog

Wednesday 19 April 2023

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहा

 अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहा

Ø जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश

Ø त्वरीत माहिती देण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 19 : बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 तसेच त्याबाबतचे नियम आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध  अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. येत्या 22 एप्रिल रोजी साज-या      होणा-या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधिक्षक/ शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी / ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर (मो. 8806488822) यांच्याशी संपर्क साधून त्वरीत माहिती द्यावी.

याबाबतच्या सुचना प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (चंद्रपूर / चिमूर), पोलिस उपअधिक्षक (गृह), सर्व तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),  जि.प. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. समाजकल्याण अधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष / सदस्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) आदींना देण्यात आल्या आहेत.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 13 (4) नुसार अक्षय तृतीया या दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणा-या व्यक्ती, विवाहात उपस्थित सर्व नागरिक, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, लग्नविधी करणारे व आदींवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या अधिनियमानुसार 2 वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीची कायद्यात तरतूद आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment