वरोरा तालुक्यातील बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश
चंद्रपूर, दि. 27: वरोरा तालुक्यात बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरोराचे उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक श्री. काचोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महीला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या समन्वयाने तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा व महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात बालविवाह थांबविण्यात यश आले.
बालविवाहातील मुलाचे वय 21 पेक्षा कमी असल्याने कागदपत्रावरून चौकशीअंती दिसून आले. सदर बालकास बालकल्याण समितीसमक्ष हजर करण्यात येत आहे. बालविवाह लावून देणे कायद्याने गुन्हा असून घरातील वडील मंडळी व गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी या प्रकारच्या प्रथेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक व सहाय्यक अधिकारी म्हणून अंगणवाडी सेविकेची जबाबदारी असते. तरीही, या प्रकारच्या घटना ग्रामीण व शहरीस्तरावर सातत्याने घडतांना दिसून येतात. दक्ष नागरीक म्हणून समाजातील सर्वच घटकांनी यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशाप्रकारच्या प्रथेला आळा घालावा. ज्यामुळे सुदृढ व सक्षम समाजाची निर्मिती होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment