जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
चंद्रपूर, दि. 26: शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत जलशक्ती अभियान: कॅच द रेन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूर्वतयारीबाबत व जलशक्ती अभियान: कॅच द रेनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांच्या प्रगतीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित बठैकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. नन्नावरे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महानगरपालिका, वनविभाग तसेच इतर विभागांनी जलशक्ती अभियानासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती अभियान पोर्टलवर अपलोड करावी. नरेगामार्फत केलेली कार्यवाही सदर पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून काही विभाग अद्यापही मागे आहेत. तसेच विभागनिहाय प्रत्येक विभागांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती अपलोड केली आहे का? याबाबत दर 15 दिवसानंतर आढावा घेण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलशक्ती अभियान : कॅच द रेन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. जलसंधारण ही जनचळवळ होणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पाटबंधारे विभागाने तलावांची माहिती अद्यावत करावी. पुढीलवर्षी पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व मुख्याधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आढावा घ्यावा व त्यासंदर्भात प्लॅन तयार करावा. पाऊस कमी झाला तरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर शेतसिंचन व उद्योगांना पाण्याची उपलब्धता करावी. असे ते म्हणाले
अमृत सरोवराचा आढावा:
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अमृत सरोवराची 17 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील व तालुकानिहाय सुरू असलेली अमृत सरोवराची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच जलजीवन मिशनमध्ये पाणीटंचाई असलेल्या भागात शाश्वत स्त्रोत निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
उष्माघातबाबत (हिटवेव्ज) आढावा:
उष्माघात (हिटवेव्ज) कृती आराखड्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने अंमलबजावणी करावी. 12 मे नंतर येणाऱ्या हिटवेव्जसाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा. उष्माघात हा सायलेंट किलर असून या उष्माघातामुळे दरवर्षी अनेक जण मृत्युमुखी पडतात. उष्माघाताच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी इमारती, रुग्णालये आदींचा आढावा घ्यावा. फायर सेफ्टीच्या बाबतीत दक्ष राहावे. शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी यांचा वेळा बदलविण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
00000
No comments:
Post a Comment