Search This Blog

Sunday, 4 June 2023

पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

 


पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा

चंद्रपूरदि ४ : राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍ह्यातील पोंभुर्णा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. यासंदर्भातील जमिन हस्तांतरणाचे आदेश चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

पोभूर्णा येथे अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍यासाठी शासनाने मान्‍यता प्रदान केली होती. राज्‍य शासनाच्‍या आदिवासी विकास विभागाने दि. ८ मार्च २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता. विशेष म्‍हणजे दि. २ मार्च २०१९ रोजी सावली येथे झालेल्‍या विविध विकासकामांच्‍या भूमिपूजन कार्यक्रमात लवकरच अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍याचे आश्‍वासन मंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार वसतिगृह मंजूर झाले. परंतु मध्यंतरीच्या काळात या वसतिगृहाचे काम जागेअभावी रखडले होते. आता पुन्हा या कामाला जोमाने सुरुवात होणार आहे.

चंद्रपूर जिल्‍ह्यातील पोंभूर्णा या आदिवासी बहुल तालुक्‍यांमध्‍ये अनुसूचित जमातीच्‍या अर्थात आदिवासी मुलां-मुलींसाठी वसतिगृह नसल्‍यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.शालेय तसेच महाविद्यालयांमधील अभ्‍यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागातून येणारे हे विद्यार्थी तालुक्‍याच्‍या ठिकाणी शिक्षणाला येतात. मात्र त्‍या ठिकाणी निवासभोजन व शैक्षणिक खर्च परवडत नसल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने वसतिगृहाचा निर्णय घेण्‍यात आला होता. जागेचा प्रश्न सुटल्याने,अनुसूचित जमातीच्‍या विद्यार्थ्यांना तेथील शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये उच्‍च शिक्षण घेणे सुलभ होणार आहे.

 जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाने आता या वसतिगृहासाठी शासकीय जमिन उपलब्ध झाली आहे.त्यामुळे लवकरच पोंभूर्णा येथे ७५ विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे एक तालुकास्‍तरीय वसतिगृह तर ७५ विद्यार्थिनी क्षमतेचे एक तालुकास्‍तरीय वसतिगृह स्‍थापन करण्‍यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment