Search This Blog

Tuesday 13 June 2023

जिल्ह्यासाठी 55598 क्विंटल बियाणांचे नियोजन

                               जिल्ह्यासाठी 55598 क्विंटल बियाणांचे नियोजन

चंद्रपूदि. 13 : खरीप हंगाम 2023 ला सुरवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी कापूस, सोयाबीन, भात व तूर तथा इतर पिके यांचे 55598 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले असून बीटी कापूस बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. चंद्रपूर कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाकरीता विविध कंपन्यांच्या संशोधित वाणांचे बियाणे परवानाधारक कृषी केंद्रावर उपलब्ध असून शेतक-यांना याबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणात बीटी बियाणे उपलब्ध असून सर्व बीटी कापूस बियाणांच्या वाणात एकाच प्रकारच्या जनुकांचा समावेश असतो. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट वाणाची मागणी शेतक-यांनी करू नये. बीटी कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो. तर येणारे उत्पन्न हे पिकांचे योग्य व्यवस्थापन तसेच जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

गुणधर्म व उत्पादन क्षमता असलेल्या बियाणांची परवानाधारक कृषी केंद्रामध्ये उपलब्धता असून एम.आर.पी. दरामध्ये बियाणांची खरेदी करून शेतक-यांनी लागवडीच्या खर्चात बचत करावी. तसेच शेतक-याने जादा दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणांची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. बाहेर राज्यातून किंवा दलालामार्फत खरेदी करणे टाळावे. याबाबत काही तक्रार असल्यास अथवा अनधिकृतरित्या कोणीही बियाणांची विक्री करीत असल्यास टोल फ्री क्रमांक 9561054229 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment