वर्षपुर्ती : विशेष वृत्त
शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ मुळे जिल्ह्यातील
4.9 लक्ष गरीब कुटुंबाचे सण गोड
Ø दिवाळी आणि गुडीपाडव्याला किटचे वाटप
चंद्रपूर, दि. 26 : आपापल्या परंपरेनुसार सण साजरे करण्यासाठी भारतीय नागरीक उत्साही असतो. त्यात आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. गरीबातील गरीब सुद्धा सणासुदीला गोडधोड करण्याची इच्छा बाळगून असतो. अशा गरीब कुटुंबाचे सण गोड होण्यासाठी राज्य शासनाने या कुटुंबाना ‘आनंदाचा शिधा’ किट पोहचविण्याचा निर्णय घेतला. दिवाळी आणि गुडीपाडवा या दोन्ही सणांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 4 लक्ष 9 हजार 275 कुटुंबाला ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्या आणि गुडीपाडव्याच्या वेळेस शासकीय कर्मचा-यांचा संप असतांना जिल्ह्यात 100 टक्के किटचे वाटप झाले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना गतवर्षी दिवाळीत आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट 100 रुपयांत वाटप करण्यात आली. या 100 रुपयांच्या किटमध्ये 1 किग्रॅ रवा, 1 किग्रॅ चणाडाळ, 1 किग्रॅ साखर आणि 1 लीटर पामतेलाचा समावेश होता. चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 1 लक्ष 38 हजार 393 लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील 2 लक्ष 70 हजार 882 लाभार्थी असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 लाभार्थ्यांना किट देण्यात आली. जिल्ह्यात दोन्ही सणांमध्ये 100 टक्के किटचे वाटप झाले असून शासनाच्या या निर्णयामुळे गरीबांचे सण गोड होण्यास मदत झाली.
विशेष म्हणजे जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी राज्य शासनाकडून आढावा घेण्यात येत होता. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांशी संवाद साधत या योजनेबाबत नागरिकांकडून माहिती घेतली. ‘आनंदाचा शिधा’ किट पासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, तसेच नागरिकांना वेळेत किटचे वाटप झाले पाहिजे, अशा सुचनाच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्यांमध्ये शासकीय गोदाम सुरू ठेवून शासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व किट गावस्तरापर्यंतच्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहचविण्यात आल्या. घरची दिवाळी सोडून गरीबांची दिवाळी साजरी करण्यासाठी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तर गुडीपाडव्याच्या दरम्यान शासकीय कर्मचा-यांचा संप सुरू असतांनाही प्राप्त झालेल्या धान्याच्या सर्व किट पोहचविण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी सांगितले.
००००००
No comments:
Post a Comment