शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रातून खरेदी करावी
Ø कृषी विभागाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 19 : बीटी कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो तर येणारे उत्पन्न हे पिकांचे व्यवस्थापन तसेच जमिनीच्या मगदूरावर/सुपीकतेवर अवलंबून असते. तुलनात्मक गुणधर्म व उत्पादन क्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रामध्ये उपलब्धता असून एमआरपी दरामध्ये गुणात्मक बियाण्यांची खरेदी करून लागवडीच्या खर्चात बचत करावी.
अशी करा कपाशी बियाण्याची निवड :
कपाशीचा वाण निवडतांना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म याचा विचार करावा. सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते, त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडाचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी मध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजार भाव मिळू शकेल. या गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. सध्या बाजारात विविध कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे उपलब्ध आहे. या सर्व वाणांमध्ये विशेष फरक नसून एखाद्या विशिष्ट वाणाची मागणी करू नये किंवा जादादराने खरेदी करू नये तसेच खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. बाहेर राज्यातून किंवा दलालामार्फत खरेदी करणे टाळावे. याबाबत काही तक्रार असल्यास अथवा अनधिकृतरित्या कोणीही विक्री करत असल्यास टोल फ्री क्रमांक 9561054229 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment