Search This Blog

Wednesday, 21 June 2023

जिल्हास्तरीय सुगंधी व औषधी वनस्पती कार्यशाळा




 

जिल्हास्तरीय सुगंधी व औषधी वनस्पती कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 21 : पारंपारिक पिकाला पर्याय म्हणून सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड जिल्ह्यात व्हावी याकरीता चंद्रपूर, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व्दारे मंगळवार, दि. 20 जुन रोजी नियोजन भवन येथे सुगंधी, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरुळकर, अखील भारतीय संशोधन समन्वय प्रकल्प प्रमुख, (औषधी सुगंधी वनस्पती) डॉ. पतके, मुख्य कार्यकारी अधिकारी (स्मरण उद्योग) महेश बोऱ्हाडे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. नागदेवते, वैनगंगा व्हॅली शेतकरी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्राचीन काळापासून मनुष्य आपले शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी  रोगांपासून मुक्त होण्यासाठी औषधी वनस्पतीचा वापर करत आला आहेतसेच भारतामध्ये पूर्वीपासून आयुर्वेद तसेच आदिवासी लोक प्रचलित औषधी वनस्पतीचा वापर करीत आहे. जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर औषधी वनस्पतीना मोठे महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. बदलती जीवनशैलीतणावयुक्त जीवनखाद्यपदार्थ आणि औषधामध्ये रसायनाचे दुष्प्रभाव, दूषित वातावरण यामुळे अनेक नवीन प्रकारचे रोगही निर्माण झाले आहेत. त्यावर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पतीची मागणीही वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुगंधी औषधी वनस्पती लागवडीकडे वळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सदर कार्यशाळेस विद्यापिठाचे तज्ज्ञ मार्गदर्शक अखील भारतीय संशोधन समन्वय प्रकल्प प्रमुख डॉ. एन. के. पतके यांनी चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलीक परिस्थ‍िती व वातावरणानुसार लागवडीस योग्य असलेल्या सुगंधी औषधी वनस्पतीच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत सादरीकरणाव्दारे सखोल मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी पारंपारीक पिकाला पर्याय म्हणून सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड जिल्ह्यात करावी. याकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न व सहकार्य केल्या जाईल, असे ते म्हणाले. सुगंधी औषधी वनस्पती लागवडीखालील क्षेत्र वाढण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपन्या व महासंघामार्फत प्रयत्न केल्या जाईल. तसेच अशाप्रकारची कार्यशाळा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आली असल्याचे चंद्रपूर वैनगंगा व्हॅली शेतकरी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांनी सांगितले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती म. हिरुळकर यांनी केले.  यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 7 प्रकारच्या विविध सुगंधी औषधी, वनस्पती लागवड तंत्रज्ञान माहिती पत्रकांचे विमोचन करण्यात आले. 

सदर कार्यशाळेस नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक तृणाल फुलझेले, कृषी उपसंचालक, आत्मा तथा नोडल अधिकारी (स्मार्ट) श्री. घोडमारे, पुरवठा व मुल्य साखळी तज्ञ गणेश मादेवार, सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा व स्मार्ट प्रकल्पातील कर्मचारी तसेच 200 पेक्षा अधिक शेतकरी, शेतकरी गट प्रतिनिधी, शेतकरी महीला व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थ‍ित होते.

०००००००

No comments:

Post a Comment