Search This Blog

Saturday, 3 June 2023

वृक्ष लागवड व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य -अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे





वृक्ष लागवड व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य -अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

वटवृक्ष लागवड मोहिमेचे उद्घाटन

चंद्रपूर, दि.03: लोकसंख्या वाढीमुळे लोकांच्या गरजा वाढत आहे. निसर्गात उपलब्ध साहित्यातून मनुष्य नवीन वस्तूंची निर्मिती करीत असतो. त्यामुळे अपरिहार्य असा ताण निसर्गावर आहे. हा ताण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन, चंद्रपूर शहर महानगरपालिका व नटराज निकेतन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, बाबूपेठ येथे वटवृक्ष लागवड ‌कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपजिल्हाधिकारी(रोहयो) पल्लवी घाटगे, मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार कांचन जगताप, विभागीय वन अधिकारी शुभांगी चव्हाण, नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, सचिव मुकुंद पात्रीकर, प्राध्यापिका डॉ. भावना कुळसंगे, अभिनेत्री स्नेहल रॉय, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पेनके, इको-प्रोचे बंडू धोत्रे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे पुढे म्हणाले, पाणी अमूल्य आहे, तर हवा निसर्गाने मुबलकपणे दिलेली आहे. वडाच्या झाडाचे अपरिमित व अमर्याद फायदे आहे. वडाच्या झाडाची लागवड सहजपणे करता येऊ शकते. या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमुळे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. दशलक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यात आहे. नागरिकांचे सहकार्य व सहभागाशिवाय हे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थानी या वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभागी होवून निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले.

मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी सांगितले की वृक्ष लागवडीच्या कार्यात जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व नटराज संस्थेसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची जोड मिळाली आहे. झाडे लावण्याचा विचार सर्वांनी मनात रुजवावा. जिल्ह्यात दहा लक्ष वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली असून सर्व नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे. शहरातील सामाजिक संस्थांच्या मदतीने व सहकार्याने  शहरात वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करू. झाडे लावण्यासोबतच त्याच्या संवर्धनाची जबाबदारी पार पाडावी, असे ते म्हणाले.

यावेळी विविध सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करण्यात आली.तदनंतर, जल प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नटराज निकेतन संस्थेचे सचिव मुकुंद पात्रीकर यांनी तर संचालन व आभार मधुरा व्यास यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment