वर्षपुर्ती : विशेष वृत्त
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात 53136 कुटुंबांना हक्काचा निवारा
Ø प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 33805 तर राज्यपुरस्कृत योजनेंतर्गत 19331 घरकूलाचे बांधकाम पूर्ण
चंद्रपूर, दि. 26 : ‘सर्वासाठी घरे – 2024’ हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान 3.0 (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. सोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात अमृत महाआवास अभियान देखील सुरू आहे. वरील अभियानांची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत 53136 कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 33805 तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत 19331 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
शासनाच्या धोरणाअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2016-17 ते 2022-23 या कालावधीकरीता 43646 चे उद्दिष्ट प्राप्त आहे. विशेष म्हणजे या सर्व घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून यापैकी 33805 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्या लाभार्थीकडे स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थीकरीता पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 50 हजारपर्यंतचे अनुदान देय आहे. तसेच अतिक्रमण नियमानुकुल योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करणे, भूमिहीन लाभार्थींना घरकुल बांधकामाकरीता शासकीय जागा विनामुल्य देणे आदी योजनेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून संपूर्ण घरकुले दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे 22873 घरकुलांचे उद्दिष्ट असून 18049 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी 13817 घरकुल पूर्ण झाली आहेत. शबरी आवास योजनेचे उद्दिष्ट 14516 असून मंजूरी 11212 तर पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या 5139 आहे. जिल्ह्याला आदीम आवास योजनेचे उद्दिष्ट 723 आहे. यापैकी 556 घरकुलांना मंजूरी देण्यात आली तर 356 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पारधी आवास योजनेचे उद्दिष्ट 35 असून 32 घरकुलांना मंजूरी आणि 17 घरकुल पूर्ण बांधून झाले आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 2 घरकुल बांधण्यात आले आहे. अशाप्रकारे राज्य पुरस्कृत विविध योजनांमधून ग्रामीण भागात एकूण 19331 कुटुंबाना हक्काचा निवारा मिळाला आहे.
००००००
No comments:
Post a Comment